- पाच तरुणांकडून उकळले लाखो रुपये…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. ११ जून २०२६) :- आयटी क्षेत्रात चांगली नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून पाच तरुणांकडून तब्बल ७ लाख ६० हजार रुपये उकळल्याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी दिनेश दत्तात्रयराव भनंग (वय २८, रा. भुकूम, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिंक्राटेक एक्स कन्सल्टन्सी, गेरा इम्पेरिया फेज-२, हिंजवडी येथील संचालक मुस्कान जुनेजा (वय २२) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना दोन महिन्यांच्या आत नामांकित आयटी कंपनीमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी प्रत्येक उमेदवाराकडून सुमारे ५० हजार रुपये कमिशन द्यावे लागेल, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला.
यानंतर फिर्यादी दिनेश भनंग यांच्याकडून २ लाख १० हजार रुपये, तसेच त्यांच्या इतर चार मित्रांकडून मिळून एकूण ७ लाख ६० हजार रुपये स्वीकारण्यात आले. मात्र ठरलेल्या कालावधीनंतरही कोणालाही नोकरी मिळवून देण्यात आली नाही. तसेच घेतलेली रक्कमही परत करण्यात आली नसल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांनी वारंवार पाठपुरावा करूनही आरोपीकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.















