पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्यातील मुलांना मिळणार उच्च दर्जाचे शिक्षण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०२४) :- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार महाराष्ट्राला तीन नवीन केंद्रीय विद्यालयांची मान्यता मिळाली असून त्यातील एक विद्यालय मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील एनडीआरएफ कॅम्पस येथे स्थापन होणार आहे. हे विद्यालय चाकण, तळेगाव, आणि पिंपरी-चिंचवड शहरांजवळ असल्यामुळे या भागातील विद्यार्थी व पालकांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या आर्थिक घडामोडी विषयक समितीने देशभरात नागरी संरक्षण क्षेत्राअंतर्गत ८५ नवीन केंद्रीय विद्यालये उघडायला आणि कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यातील केंद्रीय विद्यालयाचा
विस्तार करायला मान्यता दिली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या ८५ पैकी ३ केंद्रीय विद्यालये ही महाराष्ट्रातील असून त्यापैकी एक विद्यालय मावळ तालुक्यात आहे. मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील एनडीआरएफ कॅम्पस याठिकाणी हे केंद्रीय विद्यालय स्थापन केले जाणार आहे.
देशात सध्या १२५६ केंद्रीय विद्यालये कार्यरत आहेत. यात परदेशातील मॉस्को, काठमांडू आणि तेहरान अशा ३ केंद्रीय विद्यालयांचा समावेश आहे. एकूण १३.५६ लाख (अंदाजे) विद्यार्थी या केंद्रीय विद्यालयांमध्ये शिकत आहेत.
केंद्र सरकारने, केंद्र सरकारी / संरक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी देशभरात एकसमान दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नोव्हेंबर १९६२ मध्ये केंद्रीय विद्यालयांच्या योजनेला मान्यता दिली. परिणामी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा एक भाग म्हणून केंद्रीय शाळा संघटना सुरू करण्यात आली.
केंद्रीय विद्यालये प्रामुख्याने संरक्षण आणि निमलष्करी दलांसह केंद्र सरकारच्या बदली होणाऱ्या आणि न होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी, तसेच स्थलांतर होत राहणाऱ्या लोकांच्या मुलांसाठी आणि देशातील दुर्गम आणि अविकसित ठिकाणी राहणाऱ्या लोकांसह इतरांसाठी उघडली जातात. दर्जेदार अध्यापन, नाविन्यपूर्ण शिक्षणशाखा आणि अद्ययावत पायाभूत सुविधांमुळे केंद्रीय विद्यालय सर्वाधिक मागणी असलेल्या शाळा आहेत.