न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जानेवारी २०२५) :- प्रतिकूल परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले यांनी निर्भीडपणे विकृत मानसिकतेचा सामना करत आपल्या विचार व भूमिकेवर ठाम राहून सामाजिक क्रांतीचे पाऊल उचलले.
सावित्रीबाईंचा हा वारसा प्रत्येक महिलेने अंगीकारायला हवा. महिला अभिव्यक्त होत असताना जाणीवपूर्वक त्यांना ट्रोल करण्याची प्रवृत्ती वाढत असून संकुचित विचारसरणी आणि पुरुषी मानसिकतेचे हे प्रतिक आहे. अशा गोष्टींना महिलांसह समाजातील प्रत्येक घटकांनी ठामपणे प्रतिकार करून आपली भूमिका परखडपणे मांडली पाहिजे, असे विचार महापालिका आयोजित परिसंवादात वक्त्यांनी मांडला.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे विचार प्रबोधनपर्वाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी “सावित्रीबाई फुले यांचे विचार आणि आजच्या महिलांची भूमिका” या विषयावरील परिसंवादात सहभागी वक्ते बोलत होते. यामध्ये उद्योजिका डॉ. तृप्ती धनवटे- रामाने, पत्रकार अश्विनी डोके, शर्मिष्ठा भोसले, प्रा. शीलवंत गायकवाड सहभागी झाले होते.













