- लाखोंचे बांधकाम साहित्य जळून खाक…
ताथवडे प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
ताथवडे (दि.२४ फेब्रुवारी २०२६):- ताथवडे येथील जीवननगर परिसरात ममता रूफिंग कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत अंदाजे २० लाख रुपये किमतीचे बांधकाम साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, गोदामाच्या लगत असलेल्या मोकळ्या रानाला लागलेली आग वाऱ्याच्या जोरावर गोदामापर्यंत पोहोचली. काही क्षणांतच आगीने गोदामाला वेढा घातला. त्या वेळी आठ कामगार कामावर उपस्थित होते; मात्र त्यांनी वेळीच बाहेर पडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी तातडीने आग विझविण्याचे काम हाती घेत काही वेळात परिस्थिती नियंत्रणात आणली. गोदाम लोकवस्तीत असल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेमुळे लोकवस्तीत असलेल्या गोदामांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, प्रशासनाने अशा ठिकाणी अग्निसुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.












