- आयुक्तांच्या सहीनीशी नोकरभरतीचे बनावट पत्र झालयं व्हायरल..
- मग प्रशासनाला आलीय जाग?..
- प्रशासन विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस?…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२४ फेब्रुवारी २०२६):- पिंपरी-चिंचवड महापालिकेत आयुक्तांच्या सहीसह नोकरभरतीचे बनावट पत्र व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. थेट आयुक्तांच्या सहीने बनावट पत्र जाहीर होतेच कसे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
अलीकडे समाजमाध्यमांवर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याचे भासवणारी खोटी व दिशाभूल करणारी माहिती मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे. एवढेच नव्हे तर महापालिकेच्या नावाने बनावट नियुक्तीपत्रे आणि उमेदवारांची कथित यादीदेखील प्रसिद्ध करण्यात येत आहे. या पत्रांवर आयुक्तांची सही असल्याचा भास निर्माण करण्यात आला होता.
पत्र व्हायरल झाल्यानंतरच प्रशासन विभागाला जाग आली. त्यानंतर महापालिकेमार्फत सध्या कोणत्याही पदासाठी भरती प्रक्रिया सुरू नसल्याची सारवासारव करावी लागली. मात्र, एवढा मोठा गंभीर प्रकार घडत असताना प्रशासन झोपेत होते का, असा सवाल उपस्थित होत आहे.
बनावट पत्र उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने सारवासारव सुरू केली असून, “भरती प्रक्रियेबाबत अद्याप कोणतेही अधिकृत आदेश अथवा सूचना जारी करण्यात आलेल्या नाहीत,” अशी माहिती प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
भरती प्रक्रियेबाबतची सर्व अधिकृत माहिती वेळोवेळी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे इतर कोणत्याही माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊनच तिची खातरजमा करावी,
– मनोज लोणकर, सहआयुक्त प्रशासन विभाग…










