न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील पदव्युत्तर वैद्यकीय संस्थेच्या सात अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता दिली. त्यामुळे “वायसीएम’मध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी २४ जागा भरण्यात येणार आहेत. पदव्युत्तर वैद्यकीय संस्था सुरू करणारी पिंपरी-चिंचवड महापालिका भारतातील पहिली महापालिका आहे.
संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) व पदव्युत्तर संस्थेचे कामकाज गतिमान व सुरळीत करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले. रुग्णालयातील वाहनतळ हलविणे, ई-ग्रंथालय सुरू करण्यासाठी पाणी गळती थांबविणे, वसतिगृहाचे कामकाज २ महिन्यात पूर्ण करावे, विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था करावी. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या ३ जूनला करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याकरिता अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका पदाधिकारी व संबंधित वैद्यकीय अधिका-यांना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केल्या आहेत.
वायसीएम रुग्णालयातील चाणक्य सभागृहात गुरुवारी (दि. १६) रोजी झालेल्या बैठकीस आयुक्त हर्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, पदव्युत्तर संस्थेचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, निवृत्त अधिष्ठाता डॉ. आयुक्त मनोज लोणकर, मंगेश चितळे आदी उपस्थित होते.
ऑपरेशन थिएटरची कामे पूर्ण करून ते लवकर सुरू करावे. सर्व विभागातील यंत्रसामुग्रीची खरेदीचे दर ठरविण्यासाठी तांत्रिक समितीशी चर्चा करावी, इतर शासकीय रुग्णालय व महाविद्यालयाप्रमाणे औषध भांडार विभागात सुसूत्रता आणण्यासाठी अध्यापक वर्गाला सामील करण्याच्या सूचना पद्माकर पंडित यांनी दिल्या.











