न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२५) :- महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना उत्तम बाजारपेठ पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून महापालिका उपलब्ध करून देत आहे. उत्पादनांची गुणवत्ता आणि विपणनाचा कौशल्यपूर्ण वापर करण्यावर बचत गटांनी भर द्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त तानाजी नरळे यांनी केले.
महानगरपालिकेच्या वतीने महिला व बाल कल्याण योजनेंतर्गत महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तसेच वैयक्तिक महिलांनी तयार केलेल्या वस्तू उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांना विपणन कौशल्ये ज्ञात व्हावीत, एकूणच महिला उद्योजिका तयार होऊन महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी पवनाथडी जत्रेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील २१ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत सांगवी येथील पी. डब्ल्यू. डी मैदान येथे पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये खाद्यपदार्थांसह विविध वस्तूंची विक्री व प्रदर्शन करणाऱ्या बचतगटांना पवनाथडी जत्रेतील स्टॉलचे वाटप लकी ड्रॉ पद्धतीने करण्यात आले त्यावेळी नरळे बोलत होते.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह येथे पवनाथडी जत्रेत महिला बचतगटांना वस्तू विक्री व प्रदर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या स्टॉल्सची सोडत सहायक आयुक्त तानाजी नरळे यांच्या हस्ते लकी ड्रॉ द्वारे पद्धतीने काढण्यात आली.
यावेळी प्रशासन अधिकारी पूजा दुधनाळे, समाज विकास विभागाचे अनिता बाविस्कर, संतोषी चोरघे, कल्पना मदगे, रेश्मा पाटील, वैशाली खरात, विशाल शेंडगे, संगिता रुद्राक्षे, प्रज्ञा कांबळे, अनिकेत सातपुते, विजय देवळेकर, जयश्री पवळे, सुलक्षणा कुरणे, अमोल कावळे, मनोज मरगडे, कीर्ती वानखेडे, लखन अहिरे, रवी दुबे, तसेच विविध महिला बचत गटांच्या प्रतिनिधी आणि महापालिका कर्मचारी उपस्थित होते.
पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून महिला बचत गटांच्या उत्पादनांना एक खुले व्यासपीठ महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून दिले जात आहे. यामुळे महिला बचत गट सक्षम बनत असून त्यांच्या दर्जेदार उत्पादनांना प्रसिद्धीदेखील मिळत आहे. पवनाथडी जत्रेत वस्तू विक्री व प्रदर्शनासाठी स्टॉल उपलब्ध व्हावेत यासाठी बचत गटांच्या प्रतिनिधींनी महापालिकेकडे अर्ज सादर केले होते. त्यानुसार सुमारे ७५० बचत गटांना लकी ड्रॉ द्वारे स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये दिव्यांग तसेच तृतीयपंथीयांसाठी देखील काही स्टॉल्स राखीव ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी दिली.
यावेळी उपस्थित महिला बचत गटांच्या प्रतिनिधींच्या हस्तेही लकी ड्रॉ मध्ये असलेल्या चिठ्ठ्यांची निवड करण्यात आली आणि पवनाथडी जत्रेतील स्टॉल्सची निश्चिती करण्यात आली.
















