- महापालिकेतील संख्याबळ, परंपरा आणि राजकीय गणित महिलांच्या बाजूने..
- भाजपचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौरपद खुले (सर्वसाधारण गट) झाल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता महापौरपदाची माळ महिलांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण, महापालिकेच्या विद्यमान सभागृहात महिलांचे संख्याबळ लक्षणीय आहे.
भाजपच्या चिन्हावर ८४ तर एका पुरस्कृतासह एकूण ८५ नगरसेवक निवडून आले आहेत. यामध्ये ४२ पुरुष तर पुरस्कृतासह ४३ महिला नगरसेविका आहेत. म्हणजेच महिलांचे संख्याबळ पुरुषांपेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या स्थापनेपासून १९८२ पासून आतापर्यंत केवळ सात महिलांनी महापौरपद भूषविले असून १९ वेळा पुरुष महापौर राहिले आहेत. त्यामुळे यावेळी महिलांना संधी देण्याची जोरदार मागणी होत आहे.
महापौरपद भूषविलेल्या नगरसेवकाचा पुढील विधानसभा निवडणुकीसाठी विचार होण्याची शक्यता असल्याने, पक्ष नेतृत्व महिलेला संधी देऊन नवा राजकीय संदेश देऊ शकते, अशीही चर्चा आहे. त्यामुळे पुरुष उमेदवारांचा पत्ता कापून महिलांवर विश्वास टाकला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असले तरी सर्वसाधारण महिला, ओबीसी तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील महिला नगरसेविकांनाही संधी मिळू शकते. यामुळे इच्छुक महिला उमेदवारांची संख्या वाढली असून अंतिम निर्णयाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.















