- मराठवाड्याचा कष्टकरी वर्ग शहरात वंचितच
- पोटभरे, पीठ मळायला आलेत, पीठ महाग केलय या संबोधनामुळे त्यात आणखीनच भर
- शिवशाही व्यापारीसंघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांचे स्पष्ट मत
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड हे शहर आज जरी मेट्रो पॉलिटीन शहर म्हणून उदयाला आले असले तरी, येथील उच्चभ्रु सोसायटीत राहणा-या व्यक्तींची मने मात्र, अद्यापही मागासलेलीच आहेत. हे पुन्हा एकदा पिंपरीतील उद्यमनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला (एस. आर. ए) केलेल्या विरोधावरुन स्पष्टच होत आहे. पण, या सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे स्थानिक आमदार महेश लांडगे यांनी देखील या प्रकल्पाला विरोध करुन, गरीब आणि असाह्य जनतेलाच तुच्छ समजणे हे न सुटणारे कोडे भोसरी मतदार संघातील सर्वच झोप़डपट्टी धारकांना पडले आहे. ज्या वर्गाने व समाजाने २०१४ च्या निवडणुकीत आ. लांडगे यांना भरभरुन मते दिली, त्या वर्गावर ही वक्र कृपादृष्टी का? सुरुवातीला संतनगर येथील गरीब लोकांसाठी प्रस्तावित असलेल्या गृह प्रकल्पाला विरोध, त्यानंतर आता उद्यमनगर येथील प्रकल्पाला विरोध. त्यामुळे आ. लांडगे यांच्या संशयास्पद दुट्टपी भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत, असा आरोप शिवशाही व्यापारीसंघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला असून, त्यांच्या या कृतीचा निषेधही व्यक्त केला आहे.
या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, भोसरी मतदार संघातील सर्वच झोप़डपट्टी भागात मराठवाड्यातील उस्मनाबाद, बीड, लातूर, नांदेड, परभणी तसेच सोलापुर भागातून आलेला कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात राहत आहे. निर्सगाच्या कोपामुळे व राजकीय पुढा-यांच्या स्वार्थी मनोवृत्तीमुळे आज मराठवाडा विकासापासून कोसो दुर आहे. स्वता:चे अस्तित्व गमवून बसलेल्या व स्वाभिमानाने उभा राहण्यासाठी शहरात प्रयत्न करणारा हा मराठवाड्यातील लढाऊवृत्तीचा वर्ग आज आपल्याच राज्यात वंचिताचे जीवन जगत आहे.
या वर्गाला विकासाच्या प्रवाहात सामिल करुन घेण्याचा प्रयत्न येथील राजकारण्यांनी व स्थानिकांनी कधीच केला नाही. ”उलट पोटभरे, पीठ मळायला आलेत, पीठ यांनीच महाग केलय”, अशा अनेक नानाविध उपहासात्मक नामांतराने नेहमीच मराठवाडयातील जनतेला हिणवण्याचा प्रयत्न स्थानिकांकडून केला गेला आहे. मराठवाडा वर्ग नेहमीच स्थानिकांच्या पाठीशी उभा राहिला आहे. त्यांना सर्व प्रकारे साथ-सोबत दिली आहे. पण या उलट नाटकी आणी स्वार्थी वृत्तीच्या गुजराथी, राजस्थानी, केरळी, पंजाबी, युपी बिहारी या लोकांना शेठ, भैय्या या आदारार्थी नावाने जवळ करत त्यांना अनेक कामे, अनेक कामांचा ठेके राजकारण्यांकडून दिले जातात.
पण मराठवाड्यातील जनतेच्या पदरी हे सुख कधीच भेटले नाही आणि पुढेही भेटेल असे नाही आणि जे काही मराठवाड्यातील लोक शहरात सधन आहेत ते आपल्याच बांधवाना जवळ करत नाहीत, ही फार मोठी शोकांतिका आहे. यामुळे मराठवाड्यातील गरीब आणि कष्टकरी वर्गाचे जीवन कष्टमय हालाखीचे व पीडीतेचे ठरत आहे. पण, याच मराठवाड्यातील जनतेमुळे आज शहरातील अनेक निकृष्ट दर्जाची कामे कमी मजुरीवर केली जात आहेत. याकडे कुणाचेच लक्ष नाही. आज आपली गावे, आपली घऱे शेतपोत निसर्गाच्या कोपामुळे आहे. हे सर्व सोडून आलेला हा वर्ग आज शहरात आपली वेगली ओळख निर्माण करु पाहत असताना, त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
रोजगार, शिक्षण, आरोग्य या बरोबरच त्यांच्या निवासाचा प्रश्न देखील गंभीर आहे. ही सोडविण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असताना त्यांनीच त्यांच्या गरीब आणि असाह्यपणाची टिंगल उडवून त्यांना अजून समस्याच्या खाईत लोटणे हे कितपत योग्य आहे. निवडणुकीत झोप़डपट्टीत राहणारा हा वर्ग पैसे घेऊन मते टाकतो, हा समज येथील राजकारण्यांने करुन घेतला असल्यामुळे मराठवाडयातील बहुसंख्येने झोपडपट्टीत राहणा-या बौध्द, महार, मातंग, मुस्लिम, ओबीसी, मराठा, धनगर समाजाची किंमतही पैशातच केली आहे. त्यामुळे ज्या मराठवाड्याने देशात आपल्या आत्मसन्मानासाठी सर्वात जास्त लढे उभारले आहेत, आज त्याच मराठवाड्यातील जनतेला शहरात वंचिताचे व पिडीताचे जीवन जगावे लागत आहे, ही फार मोठी शोकांतिका आहे.
त्यामुळे आता गरज आहे, ती संघटीत होण्याची, आत्मसन्मान जागवण्याची, एकत्र येण्याची आणि आपली नविन ओळख निर्माण करण्याची. वंचित समाजाने आपापली जातपात, मनभेद विसरुन एकत्र या आणि छञपत्ती शिवाजी महाराज व क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुन्हा जोमाने पुढे न्या, असे आवाहन शिवशाही व्यापारी संघाचे युवराज दाखले यांनी या पत्रात केला आहे.











