- महिन्याभरात पाच जणांवर फौजदारी, सहा लाखांचा दंडही वसूल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मार्च २०२५) :- ‘दिसला खांब की लाव किऑस्क’, लाव पोस्टर, बॅनर’ अशी स्थिती पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांवर दिसून येत आहे. त्यामुळे जाहिरातदार फुकटात जाहिराती करीत आहेत. अशाने महापालिकेचे कोट्यवधींचे उत्पन्न बुडत आहे. परंतु, याला महिन्याभरात काहीशी जरब बसलेली दिसतेय.
महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून किऑस्क, पोस्टर, बॅनर लावणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. फेब्रुवारी महिन्यात तब्बल पाच जणांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर क्षेत्रीय कार्यालयनिहाय फुकट्या जाहिरातदारांकडून केवळ एकाच महिन्यात ५,७८,००० रूपये एवढा आर्थिक दंड वसूल केला आहे.
२६ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या एकाच महिन्यात २६४४ पोस्टर, बॅनरवर तर १६,३६५ किऑस्कवर या विभागाने कारवाई केली आहे. त्यामुळं अनधिकृत फलकबाजी करणाऱ्यांना या कारवाईमुळे निश्चितच चाप बसेल. दरम्यान जाहिरात फलक काढण्यासाठी महापालिकेची यंत्रणा राबत आहे. कारवाईनंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी पुन्हा ते लावले जात आहेत. त्यांचा सुळसुळाटही पाहायला मिळतो. त्यामुळे शहर विद्रुपीकरणात भर पडत आहे. त्यामुळे कारवाईची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे.
”शहरातील फलकधारकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. चौक, मोकळ्या जागा, सीमाभिंत, खांब अशा ठिकाणी बेकायदेशीरपणे फलक झळकत हाेते. त्यामुळे महापालिकेने २६ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत विशेष माेहीम राबविली. या माेहिमेमध्ये १९,००० होर्डिंग, किऑक्स, फलक काढण्यात आले. बेकायदा फलक लावणाऱ्यांवर दंड करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार पाच जणांवर महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १८ व्यावसायिक आणि ११ नागरिकांकडून पाच लाख ७८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे”…
– डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त – आकाशचिन्ह व परवाना विभाग – पिंपरी चिंचवड महानगरपालिका…


















