न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च २०२५) :- महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून आतापर्यंत ८१० कोटींचा मालमत्ताकर वसूल करण्यात आला आहे. या विभागास १ हजार कोटीचे ‘टार्गेट’ आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत म्हणजे केवळ २० दिवसांत १९० कोटी रुपये वसुलीचे आव्हान या विभागासमोर आहे.
कर संकलन विभागाने मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून त्या सील करण्याची कारवाई तीव्र केली आहे. आतापर्यंत एकूण ४ लाख ७८ हजार ६५८ मालमत्ताधारकांनी ८१० कोटी रुपयांचा भरणा केला आहे. कर संकलन विभागास १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या आर्थिक वर्षात एक हजार कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट आहे.
त्यामुळे उर्वरित २० दिवसांत त्या विभागास तब्बल १९० कोटींच्या वसुलीसाठी कारवाई मोहीम तीव्र करावी लागणार आहे. त्या दृष्टीने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना वसुलीचे लक्ष्य दिले आहे. त्यामुळे येत्या वीस दिवसांत कर संकलन विभागास १९० कोटी रूपये वसूली करावयाची आहे. त्यादृष्टिने महापालिकेकडून मोहिम राबवली जाणार आहे.
“थकबाकीदारांकडून थकबाकीसह संपूर्ण मालमत्ताकर वसुलीसाठी कारवाई मोहीम तीव्र करण्यात आली आहे. ८७७ मालमत्ता सील केल्या आहेत. त्यापैकी ४३८ थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. मुदतीमध्ये थकीत बिल न भरल्यास त्या मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे”.
– अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, महापालिका


















