न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च २०२५) :- महापालिकेतील अभियंते आणि पोलिस अधिकाऱ्यांनी शहरातील रस्ते अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने आयोजित फंडामेंटल्स ऑफ सेफर स्ट्रीट्स या कार्यशाळेत भाग घेतला.
या कार्यशाळेद्वारे अधिकाऱ्यांना सुरक्षित रस्ते डिझाइनविषयी मूलभूत ज्ञान मिळविण्यास मदत झाली. महापालिकेने ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी अंतर्गत भागीदार असलेल्या ग्लोबल डिझाइनिंग सिटीज इनिशिएटिव्ह यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते झाले.
कार्यशाळेत महापालिका अभियंते, पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलीस अधिकारी, महामेट्रो अधिकारी आणि सल्लागारांसह एकूण ७३ लोक सहभागी झाले होते. या कार्यशाळेद्वारे अभियंते व पोलीस अधिकाऱ्यांना उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली. पादचारी, सायकलस्वार, मोटारसायकलस्वार आणि सार्वजनिक वाहतूक वापरणारे यांच्या दृष्टीकोनातून उपस्थित अधिकाऱ्यांनी शहरातील रस्त्यांचे मूल्यमापन केले. त्यासाठी लहान मुलांच्या उंचीच्या कोनातून रस्त्यांचे निरीक्षण करणारे उपकरण वापरण्यात आले. काही अधिकाऱ्यांनी व्हीलचेअरचा वापर केला आणि डोळ्यांवर पट्टी बांधून अपंग व्यक्तींच्या दृष्टीकोनातून देखील रस्त्यांचे मूल्यमापन केले.











