- आ. सुनील शेळके यांच्याकडे नागरिकांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सुदुंबरे वार्ताहर (दि. १७ मार्च २०२५) :- चाकण-तळेगाव-शिक्रापूर महामार्गावरील तीर्थक्षेत्र सुदूंबरे येथे महामार्गालगत असलेल्या संत जगनाडे महाराज कमानीलगत पीएमपी बस थांबा उभारण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे. या महामार्गावर भरधाव वाहने ये जा करीत असतात. बसथांबा नसल्यामुळे नागरिक रस्त्याच्या कडेला थांबतात. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे.
दरम्यान मुख्य महामार्गापासून दोन किलोमीटर आता हे गाव वसलेले आहे. गावातून थेट चाकण, तळेगाव, देहू येथे जाण्यासाठी वाहनांची कमतरता आहे. खासगी रिक्षा आहेत परंतु, त्या ठराविक कालवधीतच उपलब्ध असतात. निगडी ते सुदुंबरे अशी पीएमपी बस सेवा सुरु आहे. परंतु, तिच्या फेऱ्या मर्यादित आहेत.
सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. गावातून विविध ठिकाणी नागरिक कामानिमित्त जात असतात. त्यात कामगारांची संख्या अधिक आहे. त्यांना येथील महामार्गालगत असलेल्या संत जगनाडे महाराज कमानीलगत यावेच लागते. तिथे बस थांबा नसल्याने प्रवाशांना भर उन्हात आणि रात्री देखील जागा मिळेल तिथे तासनतास वाहनाची वाट पाहत ताटकळत बसावे लागते. त्यामुळे त्यांचा कडक उन्हापासून बचाव व्हावा, रात्रीच्या सुमारास प्रवासी महिलांना देखील सुरक्षित वाटावे यासाठी संत जगनाडे महाराज कमानीलगत सुसज्ज बसथांब्याची उभारणी करावी, अशी मागणी होत आहे.
चाकण एमआयडीसी, पिंपरी चिंचवड शहर, देहूगाव तसेच तळेगाव परिसरात जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. रात्री-अपरात्री तसेच सध्या वाढत्या उन्हामुळे नागरिकांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील आण्णा शेळके यांनी या प्रकरणात लक्ष घालून आमदार निधीतून अथवा पीएमपी प्रशासनानाला पीएमपी बस थांबा उभारून देण्याची सूचना करावी, अशी येथील स्थानिक नागरिकांची मागणी आहे.











