न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२५) :- शहरामध्ये अनेक डॉक्टर रुग्णांना थेट औषधे विक्री करतात. हे बेकायदेशीर आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया आणि फार्मसी कायदा १९४८ च्या नियमानुसार डॉक्टरांना औषध विक्री करण्यास परवानगी नाही. त्यामुळे असे करणाऱ्या डॉक्टरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केमिस्ट असोसिएशन पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष विवेक तापकीर यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मेलद्वारे केली आहे.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रानुसार, डॉक्टरांनी औषधांची विक्री करणे रुग्णांच्या आरोग्यास हानीकारक आहे. तसेच यामुळे सरकारच्या महसुलावरही मोठा परिणाम होतो. औषध विक्रीवर लागणाऱ्या करांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. डॉक्टरांकडून विकल्या जाणाऱ्या औषधांची गुणवत्ता, साठवणूक आणि संपूर्ण वितरण प्रक्रिया कोणत्याही नियामक नियंत्रणाखाली नसते. यामुळे चुकीची औषधे दिली जाण्याचा किंवा औषधांचा दुरुपयोग होण्याचा धोका वाढतो. ही प्रक्रिया कायद्याच्या विरोधात असून, नोंदणीकृत फार्मासिस्ट व औषध विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
औषध विक्रीवर जीएसटी व अन्य कर लागू होतात. मात्र, डॉक्टरांकडून औषध विक्री होत असल्याने त्यावर कुठलाही कर भरला जात नाही आणि सरकारच्या महसुलावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे अशी बेकायदेशीर औषध विक्री उघडकीस आणण्यासाठी तपासणी मोहिमा राबवाव्यात, अशी मागणी तापकीर यांनी केली आहे.