- पिंपरी चिंचवड आणि मावळमधील सुमारे १००० श्रीसदस्य मोहिमेत सहभागी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२५) :- जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने सोमवारी सकाळी श्रीक्षेत्र देहूगाव आणि भंडारा डोंगर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानांतर्गत आज सकाळी ६ ते ८ या अवघ्या दोन तासांच्या कालावधीत देहू परिसर, मंदिर परिसर,इंद्रायणी नदी घाटाची स्वच्छता करून श्री सदस्यांनी सुमारे १६ टन कचऱ्याचे संकलन केले. यामध्ये २ टन ओला कचरा आणि १४ टन सुका कचरा संकलित करण्यात आला. यावेळी गाथा मंदिर ते मुख्य कमानपर्यंत दुतर्फा रस्त्याची व अंतर्गत रस्त्यांची स्वच्छता या अभियानात करण्यात आली. या अभियानात डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील सुमारे १००० श्री सदस्यांनी सहभाग नोंदवला.
“स्वच्छ देहू, पवित्र देहू” या संकल्पनेला बळ देत, सर्व श्रीसदस्यांनी देहूतील मुख्य मंदिर परिसर, इंद्रायणी नदी घाट परिसर, गाथा मंदिर तसेच भंडारा डोंगरातील पवित्र स्थळे स्वच्छ केली. त्याचबरोबर मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांचीही स्वच्छता करण्यात आली.











