- पालिका प्रशासनाला दिड वर्षानंतर सुचलयं शहानपण..
- सेवानिवृत्त आणि पदोन्नती मिळालेला अभियंताही कारवाईस पात्र?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२५) :- महापालिकेच्या अभियंत्यांनी शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांची व इतर कामे दर्जाहीन केल्याच्या अहवालावर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणे (सीओईपी) ने शिक्कामोर्तब केले. त्यानंतर स्थापत्य विभागातील १७ कनिष्ठ अभियंत्यांची विभागीय चौकशी सुरू केल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाने दुरुस्ती व देखभाल कामांची निविदा प्रक्रिया सन २०१९-२० मध्ये राबविली. ती सर्व कामे तब्बल ४० टक्केपेक्षा कमी खर्चात पूर्ण करण्यात आली. या कामांसंदर्भात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या कामांत दर्जा राखला नसून, ती कामे दर्जाहीन झाल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्याची दखल घेऊन सिंह यांनी ती सर्व १७ कामे सीओईपी संस्थेकडून तपासून घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार, सीओईपीच्या प्रतिनिधींनी २७ जून ते १२ जुलै २०२३ या कालावधीत प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी केली. त्याचा अहवाल १९ ऑक्टोबर २०२३ ला महापालिकेच्या दक्षता व गुणनियंत्रण कक्षाकडे सादर केला. त्या कामांचा खर्च संबंधित ठेकेदारांकडून वसूल करण्याचे सांगण्यात आले. आयुक्तांच्या आदेशानुसार ठेकेदारांकडून तो खर्च वसूल करण्यात आला. मात्र, दोषी १७ कनिष्ठ अभियंत्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती.
कनिष्ठ अभियंत्यांना कामाबाबत अनास्था आणि कर्तव्याप्रति निष्काळजीपणा तसेच प्रशासकीय कामकाजातील हलगर्जीपणा आणि कर्तव्यातील उदासीनता दिसून येते. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम ५६ व महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या तरतुदीनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत शहर अभियंता मकरंद निकम यांनी कारणे दाखवा नोटीस बजाविली होती. त्यांच्याकडून खुलासा प्राप्त झाल्यानंतर शहर अभियंता निकम यांनी आयुक्त सिंह यांच्याकडे कारवाईची शिफारस केली होती. त्यानंतर आता दोषी १७ कनिष्ठ अभियंत्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले आहे.
या कामांबाबत महापालिकेने ऑक्टोबर २०२३ मध्ये अहवाल सादर केला होता. त्यानंतर संबंधित ठेकेदारांकडून निकृष्ट कामांचा खर्च वसूल करण्यात आला होता. मात्र, अभियंत्यांवर कोणतीही कारवाई केली नाही. आता तब्बल दीड वर्षानंतर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या कालावधीत काही अभियंते सेवानिवृत्त झाले आहेत. तर काहींना पदोन्नती देण्यात आली आहे.
या अभियंत्यांची विभागीय चौकशी सुरू…
वर्षा कदम, अंकुश सईजराव, संदीप खोत, विजय जाधव, अग्गू घेरडे, महेंद्र देवरे, वृषाली पोतदार, अशोक मगर, विकास गोसावी, राजेंद्र इंगळे, संजय खरात, शिवाजी वाडकर, संध्या वाघ, सुनील दांडगे, निखिल फेंडर, राजेंद्र क्षीरसागर, धनंजय गवळी.