न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ डिसें) :- भारतातील सर्वात मोठे ‘किसान कृषि प्रदर्शन’ १२ ते १६ डिसेंबर २०१८ दरम्यान मोशी येथे भरविण्यात येणार आहे. बुधवार (दि.१२ ) रोजी सकाळी नऊ वाजता शेतक-यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे.
या प्रदर्शनात देश, विदेशातील सहाशेपेक्षा अधिक कंपन्या, संशोधन संस्था सहभागी होणार आहेत. तसेच विद्यापीठ, कृषी महाविद्यालये, संशोधन संस्था, शेतक-यांसाठी काम करणा-या सामाजिक संस्था देखील सहभाही होणार आहेत. याबाबतची माहिती ‘किसान’ कृषि प्रदर्शनचे संयोजक निरंजन देशपांडे यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत दिली.
प्रदर्शन प्रवेशासाठी नावनोंदणी शुल्क १०० रुपये ठेवण्यात आले आहे. पूर्वनोंदणीची सुविधा kisan.net या संकेतस्थळावर आणि kisan.net या मोबाईल अँपवर उपलब्ध आहे. पूर्वनोंदणी केल्यास प्रवेश शुल्कात ५० रुपये सवलत देण्यात आली आहे. प्रदर्शन स्थळी जाण्यासाठी पुण्याच्या शिवाजीनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र, लोकमंगल बस स्टॉप पासून बसची मोफत सोय करण्यात आली आहे. किसान प्रदर्शनाविषयी अधिक माहितीसाठी ०२०-३०२५२०२० किंवा www.kisan.in या संकेतस्थळावर संपर्क करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.