न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ डिसें) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी संचालकांची बैठक बुधवार (दि. ५) रोजी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या अनुपस्थित महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये स्मार्ट सिटीच्या धर्तीवर ‘म्युनिसिपल क्लासरूम’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसे गटनेते सचिन चिखले, सह शहर अभियंता राजन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीळकंठ पोमण उपस्थित होते.
महापौर राहुल जाधव म्हणाले की, पिंपरी, भोसरी आणि चिंचवडमधील बारा शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेच्या सर्व शाळा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून स्मार्ट करण्यात येणार आहेत. यासाठी ४० कोटी निधी खर्च करुन, अत्याधुनिक सेवासुविधा उभारण्यात येणार आहेत. यात पिंपळे गुरव, चिखली म्हेत्रे वस्ती, सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर येथील दोन माध्यमिक शाळा, जाधववाडी, निगडीतील, लांडेवाडी, चिखली, कुदळवाडी, तळवडे, भाटनगर, मोहननगर या परिसरातील महापालिकेच्या शाळांची पहिल्या टप्प्यात निवड करण्यात आली असल्याचे महापौर राहुल जाधव यांनी सांगितले.