न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ डिसें.) :- शासनाने आधुनिक कारणासाठी मोठ्या उद्योगांना स्वयंचलित मशिनरी आयात करण्याची परवानगी दिली आणि उद्योगात वाढणाऱ्या रोजगार निर्मितीला अडथळे निर्माण केले. मोठ्या उद्योगात कामगार कपात, ठेकेदारी तत्वावर कामगार स्वीकारण्यास परवानगी दिल्याने कामगारांच्या बेरोजगारीत वाढ झालेली आहे. उद्योगातील रोजगार कमी झाला आहे. शासन हात झटकण्याचे काम करीत आहे. पुणे परिसरात सर्वात जास्त महाविद्यालये आहेत. त्यातून लाखो मुले पदव्या घेऊन बाहेर पडतात. परंतु, या तरुण-तरुणींना रोजगारासाठी पुणे शहराच्या बाहेर जावे लागते. या परिस्थितीत लघु उद्योजकांसाठी काम करणारी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन ही संघटना पुढे आली आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरात मोठ्या प्रमाणात अल्पशिक्षित व उच्चशिक्षित तरुण व तरुणी आहेत. त्यांना व्यवसायात उतरवून त्यांच्यामार्फत अनेकांना रोजगार मिळेल व कायमचा बेरोजगारीचा प्रश्न मिटेल, यासाठी फोरमच्या माध्यमातून ‘रोजगार व व्यवसाय समूह ग्रुप योजनेची’ स्थापना करण्यात येणार आहे. या योजनेची मुहूर्तमेढ १४ डिसेंबर रोजी भोसरी एमआयडीसीतील ‘टी ब्लॉक’ येथे दुपारी दोन वाजता होणार आहे. लवकरच पुणे शहर, हडपसर, हिंजवडी, पिरंगुट तसेच चाकण एमआयडीसी आदी परिसरात योजनेचा विस्तार होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार महिला व युवकांसाठी रोजगार व व्यवसाय निर्माण करून दिला जाणार असल्याचे, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले आहे.
अभय भोर म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी व शहरातील सुशिक्षित बेकार तरुणांसाठी स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे अनेक व्यवसायाच्या संधी व रोजगार यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी महिलांना व युवकांना इलेक्ट्रिकल रिक्षाद्वारे एमआयडीसी परिसरात कमीत कमी २२ ब्लॉकमध्ये अंतर्गत वाहतूक योजना चालू करण्यात येणार आहे. त्याद्वारे कमीत कमी दोन हजार युवकांना रोजगार उपलब्ध होतील. अन्य व्यवसाय, उत्पादने तसेच प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
या योजनेच्या माध्यमातून अनेक बचत गटातील महिलांना त्यांची उत्पादने बाजारपेठेत पोहोचविण्यासाठी मदत होईल. तसेच त्याला बाजारपेठ उपलब्ध करून देऊन, एमआयडीसी सारख्या मोठ्या परिसरांमध्ये त्याची विक्री करण्यासाठी ठीक-ठिकाणी त्याचे स्टॉल उभे करून, महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत इतर बेरोजगार तरुणांचे गट तयार करून, त्यांनाही रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी काही कंपन्यांनी सहकार्य करण्याची तयारीही दर्शवली असल्याचे, अभय भोर यांनी न्यूज पीसीएमसीशी बोलताना सांगितले आहे.