न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ डिसें.) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने गुरुवार (दि. ६) रोजी मोशी-प्राधिकरण येथील गॅलक्सी किड्स प्री. प्रायमरी स्कूलमध्ये गोवर-रूबेला लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती. शाळेतील ४० विद्यार्थ्यांना या वेळी लसीकरण करण्यात आले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका माधवी जनार्धनन, महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी, शिक्षिका, विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी महापालिका आरोग्य कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देवून, लसीकरण केल्याबद्दल आभार मानले.
शाळेच्या मुख्याध्यापिका माधवी जनार्धनन यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना गोवर-रूबेला लसीकरण मोहीमेचे महत्व पटवून सांगितले. रोग प्रतिकार शक्ती कमी असल्याने लहान मुले क्षयरोग, पोलिओ, धनुर्वात, घटसर्प, गोवर, रूबेला, हिमोफिलीयस एन्फ्लुएंझा ब, मेंदुज्वर, न्युमोनिया या प्रकारच्या आजारांना बळी पडतात. बालवयात होणारे रोग टाळण्याच्या सर्वात प्रभावी मार्गांपैकी एक म्हणजे लसीकरण. कोणताही रोग होण्याअगोदर त्यास प्रतिबंध करणे हाच खरा उपाय असतो. त्यामुळेच महापालिकेने सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली असल्याचे माधवी जनार्धानन यांनी महत्व पटवून सांगताना सांगितले.