- पक्षातच राहणार असल्याचे सुतोवाच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी बुधवारी (दि. ११ नोव्हेंबर) आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे सुर्पूद केला.
बुधवारी साठे यांनी चिंचवड येथे पत्रकार परिषदेत आपल्या शहराध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची माहिती दिली. या पत्रकार परिषदेत माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत नेवाळे, शाम आगरवाल, कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, ज्येष्ठ नेत्या शामला सोनवणे, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, राजेंद्रसिंह वालिया, मयूर जयस्वाल, ॲड. क्षितीज गायकवाड, सज्जी वर्की, मकरध्वज यादव, सुनिल राऊत, शहाबुद्दीन शेख, बाळासाहेब साळुंखे, लक्ष्मण रुपनर, भाऊसाहेब मुगूटमल, विशाल कसबे, संदेश बोर्डे, गौरव चौधरी, ॲड. अनिरुध्द कांबळे, बाबा बनसोडे आदी उपस्थित होते.
साठे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, मला प्रदेश कमिटीने गेली सहा वर्षे शहराध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष व सर्व पदाधिका-यांचा मी आभारी आहे. मी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार आहे. मागील सहा वर्षात मी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना भेडसावणा-या अनेक प्रश्नांबाबत स्थानिक पातळीवर तसेच राज्य सरकारकडे वेळप्रसंगी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. त्यासाठी अनेकदा रस्त्यावर उतरुन आंदोलने व निदर्शने केली व सह्यांची मोहिम राबविली. यातील बहुतांश प्रश्न सोडविण्यात यशस्वी झालो. यामध्ये प्रामुख्याने शहरातील पाणी समस्या, रिंग रोड, प्राधिकरण पीएमआरडीकडे वर्ग करणे, गॅस दरवाढ विरोधी आंदोलन, शहरातील जुन्या मिळकतींना करवाढीस विरोध, शहरातील अनधिकृत बांधकाम, रेड झोनचा प्रश्न, शेतकरी व कामगारांविरोधी केंद्र सरकारने केलेल्या कायद्यास विरोध, महिलांवरील अन्याय अत्याचाराबाबत निदर्शने, लॉक डाऊन काळातील मिळकत कर माफी, लॉकडाऊन काळात माल वाहतूक व प्रवासी वाहतूक करणा-या सर्व व्यावसायिकांना परिवहन खात्याकडून आकारण्यात येणा-या करात व वीमा रक्कमेत सूट मिळण्याबाबत तसेच सर्व कर्जदारांना लॉकडाऊन काळातील कर्जावरील व्याज व चक्रवाढ व्याजात सवलत मिळावी याबाबत यशस्वीपणे प्रयत्न केले. या काळात स्थानिक निवडणूकीसह खासदार आणि आमदार पदाच्या निवडणूका झाल्या. या सर्व काळात शहरातील पक्षाच्या सर्व आजी, माजी नगरसेवकांनी पक्षांच्या विविध सेलचे पदाधिकारी यांनी मला सहकार्य केले. त्याबाबत मी त्यांचा तसेच वेळोवेळी कॉंग्रेस पक्षाची भूमिका समाजासमोर आपल्या विविध माध्यमांव्दारे मांडणा-या पत्रकार, छायाचित्रकार तसेच व्हिडीओग्राफर यांचा देखिल मी आभारी आहे. येथून पुढे पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिपणे पार पाडेल अशीही ग्वाही सचिन साठे यांनी यावेळी दिली.