- शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यासाठी सोमवार सुनावणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ एप्रिल २०२४) :- शाळेतील पटावर नोंद असलेल्या १०० टक्के विद्यार्थ्यांचे युडायस व सरल प्रणालीत आधार वैधता करण्याविषयी संपूर्ण वर्षभर वारंवार सूचना देऊन, याविषयी पाठपुरावा करूनही अद्याप आधार वैधता केलेली नाही. युडायस व सरल प्रणालीमध्ये आधार वैधता न केल्याने शहरातील नऊ खासगी शाळांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. तसेच या शाळांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यासाठी सोमवार (दि..२९) रोजी सुनावणी प्रस्तावित केली आहे, अशी माहिती प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी दिली.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी युडायस प्रणालीमधील माहिती आधारभूत मानण्यात येते. विद्यार्थी आधार वैधतेबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून वारंवार विचारणा होत आहे. याबाबत राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे मुख्य प्रधान सचिव यांनी २२ एप्रिल २०२४ रोजी घेतलेल्या आढावा बैठकीत आधार वैधता न भरल्याने शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांनी सुनावणीसाठी समक्ष महापालिकेच्या शिक्षण विभागात सोमवार (दि.२९) सकाळी ११ वाजता उपस्थित राहावे, तसेच सुनावणीला येताना शाळेचे शासन मान्यता पत्र, उपसंचालक मान्यता पत्र, प्रथम मान्यता पत्र, स्व मान्यता घेऊन येणे आवश्यक असणार आहे.
सुनावणीला समक्ष उपस्थित न राहिल्यास अथवा प्राप्त खुलासा असमाधानकारक वाटल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता शाळांच्या विरुद्ध योग्य ती शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, याशिवाय शाळा मान्यता काढण्याची शिफारस शिक्षण उपसंचालक, पुणे यांच्या विभागाकडे करण्यात येईल, यांची गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही शिक्षण विभागाने दिलेल्या कारणे दाखवा नोटिशीत म्हटले आहे.