- स्वतंत्र सार्वजनिक बस यंत्रणा उभी करावी..
- पिंपरी-चिंचवड शहराला ‘पीएमपीएमएल’ कडून वारंवार सापत्नपणाची वागणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ एप्रिल २०२४) :- निगडीतून रात्री सव्वाअकराची शेवटची बस जाते. मात्र त्यानंतर पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची बसअभावी ससेहोलपट होते. तशीच परिस्थिती रात्री अकरानंतर पुण्यातून पिंपरी-चिंचवडकडे येणाऱ्या प्रवाशांची असते. एसटी किंवा रेल्वे स्थानकावर तर रात्री-अपरात्री उतरल्यानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसेस नसल्यामुळे खासगी वाहनचालक प्रवाशांची लूट करत आहेत. ‘पीएमपीएमएल’ला पुणे आणि पिपरी-चिंचवड महापालिकेकडून ६०:४० या प्रमाणात आर्थिक सहकार्य केले जाते. मात्र, त्या बदल्यात पिंपरी-चिंचवड शहराला वारंवार सापत्नपणाची वागणूक दिली जात आहे. पुणे शहरात रात्रीच्या वेळी कात्रज ते वाकडेवाडी स्थानक (शिवाजीनगर), कात्रज ते पुणे स्टेशन, हडपसर ते स्वारगेट, हडपसर ते पुणे स्टेशन, पुणे रेल्वे स्थानक ते एनडीए गेट या मार्गावर रातराणीच्या ४३ फे-या होतात. स्मार्ट सिटी आणि उद्योगनगरी असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात मात्र, एकाही मार्गावर रातराणी बससेवा दिली जात नाही. त्यामुळे पीएमपीएमएलमधून पिंपरी चिंचवड महापालिकेने बाहेर पडावे आणि स्वतंत्र सार्वजनिक बस यंत्रणा उभी करावी, असा नवा विचार आता शहरवासियांकडून पुढे येत आहे.
शहराचा औद्योगिक विकास झाल्यामुळे देशभरातील नागरिक येथे स्थायिक झाले आहेत. पिंपरी आणि चिंचवड रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस रेल्वे थांबत नसल्यामुळे नागरिकांना पुणे स्थानकावर उतरावे लागते. एसटी बसने आल्यावर वल्लभनगर आगारात उतरावे लागते. काही एसटी बसेस वल्लभनगरला न थांबता थेट शिवाजीनगर आगारात थांबतात. निगडीतून पुण्याकडे रात्री सव्वाअकराची शेवटची बस जाते, त्यानंतर तिकडे जाणाऱ्या प्रवाशांना खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागतो. तशीच परिस्थिती रात्री अकरानंतर पुण्यातून पिंपरी- चिंचवडकडे येणाऱ्या प्रवाशांची असते. स्थानकाकड जाण्यासाठी रात्री १०:१५ वाजता शेवटची बस आहे, तर तेथून येण्यासाठी ११ वाजता शेवटची बस आहे.
निगडीतून हडपसर, कात्रजकडे जाणारी शेवटची बस ११:१५ वाजता आहे. त्यानंतर सकाळी ४:४५ वाजता बससेवा सुरू होते. शेवटची बस निगडीतून पुणे रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी रात्री १०:१५ वा. पुणे रेल्वेस्थानकाकडून निगडीकडे येण्यासाठी रात्री ११:०० वा. निगडीतून हडपसर, कात्रजकडे जाण्यासाठी रात्री ११:१५ वाजता आहे. रात्री-अपरात्री एसटी किंवा रेल्वेने आल्यावर पिंपरी-चिंचवडकडे जाण्यासाठी रिक्षा किंवा ओला, उबेर कॅबचा आधार घ्यावा लागतो. रिक्षाचालक मनमानी पद्धतीने भाडे आकारतात. काही वेळा तर ते अरेरावी करतात. ओला आणि उबेरचेही रात्रीचे दर जास्त आहेत. त्यामुळे सर्वांनाच रात्री खासगी वाहनांचा प्रवास परवडत नाही.
पुणे शहरात पीएमपीएमएलकडून रात्री उशिरा दीडपट भाडे आकारून रातराणी बससेवा दिली जाते. ही सेवा पिपरी-चिंचवड शहरात मात्र सुरू नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. तसेच तळेगावकडे जाताना खासगी वाहनचालक दोन्ही वेळेच्या टोलची आकारणी करतात. त्यामुळे भुर्दंड पडतो. शहरात रात्री एसटी किवा रेल्वेने आल्यावर इच्छितस्थळी जाण्यासाठी बसेस नसल्यामुळे खासगी वाहनचालक प्रवाशांची लूट करतात. त्यामुळे रेल्वे स्थानक व एसटी स्थानकांवरून रात्री उशिराच्या पीएमपी बस सुरू कराव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे.
वाकडेवाडी एसटी स्थानक आणि वल्लभनगर एसटी स्थानक यांना जोडणाऱ्या मार्गाचे सर्वेक्षण करण्यात येईल. त्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातही रातराणी सेवा सुरू करण्यात येईल.
– सतीश गव्हाणे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल…