न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ एप्रिल २०२४) :- बारामती तालुक्यातील मोरगाव येथे राज्य वीज महावितरण कर्मचारी महिलेचा खुन करण्यात आला. याच्या निषेधार्थ तळेगाव दाभाडे येथील वीज कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (दि. २५) काळ्या फिती लावून निषेध केला.
मोरगाव येथील महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञ रिंकू गोविंदराव बनसोडे (वय ३६) यांच्यावर अभिजित दत्तात्रय पोटे याने बुधवारी (दि. २४) कोयत्याने हल्ला केला होता. यामध्ये उपचारा दरम्यान रिंकू बनसोडे यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेचा तळेगाव दाभाडे येथील उपविभागीय कार्यालयासमोर कर्मचा-यांनी काळ्या फिती लावून निषेध केला.
यावेळी उप कार्यकारी अभियंता राजेंद्र गोरे, सहायक अभियंता प्रशांत पवार, सुखदेव मालपोटे यांसह तळेगाव दाभाडे आणि वडगाव उपविभागातील वीज अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी रिंकू बनसोडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.