- संजोग वाघेरेंच्या अडचणीत नामसाधर्म्यामुळे भर?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ एप्रिल २०२४) :- मावळ लोकसभा मतदारसंघासाठी ३८ उमेदवारांनी ५० अर्ज दाखल केले आहेत. महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडीसह इतर पक्ष व अपक्षांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. आज शुक्रवारी अर्जाची छाननी असून, सोमवारी माघारीच्या अंतिम मुदतीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यात १८ एप्रिलपासून सुरुवात झाली. महायुतीकडून श्रीरंग बारणे, महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे, ‘वंचित’कडून माधवी जोशी यांच्यासह १८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.
अखेरच्या दिवशी गुरुवारी सर्वाधिक २० उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामध्ये पंकज ओझरकर, मनोज गरबडे, उमाकांत मिश्रा, लक्ष्मण अढाळगे, इकबाल नावडेकर, संजय वाघेरे, अजय लोंढे, गोविंद हेरोडे, राजू पाटील, दादाराव कांबळे, चिमाजी शिंदे, राजेंद्र काटे, राजाराम पाटील, हजरत पटेल, राजेंद्र छाजछिडक, मारुती कांबळे, संजोग पाटील, रफिक सय्यद, भाऊ आडागळे, विजय ठाकूर यांचा समावेश आहे.
नामसाधर्म्य साधण्याचा प्रयत्न…
महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्याशी नामसाधर्म्य असलेल्या दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत. संजय सुभाष वाघेरे आणि संजोग रवींद्र पाटील अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत. संजोग वाघेरे-पाटील मावळ मतदारसंघातील असून संजय वाघेरे मतदारसंघाबाहेरील उमेदवार आहेत.