- देशात निवडून येण्याचा उच्चांक; मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२१) :- देशात सर्वाधिक वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा उच्चांक नोंदविणारे शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव अण्णासाहेब देशमुख यांचे सोलापुरातील खासगी रुग्णालयात शुक्रवारी रात्री निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. देशमुख यांना काही दिवसांपूर्वी पित्ताशयाच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना कृत्रिम जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते.
देशमुख यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एक राजकीय नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या एकाच मतदारसंघातून आणि एकाच पक्षाकडून सर्वाधिक अकरावेळा निवडून आले. एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे दिवंगत नेते एम. करुणानिधी यांचा विक्रम त्यांनी मोडला होता.
मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे १० ऑगस्ट १९२६ रोजी शेतकरी कुटुंबात जन्म झालेले देशमुख हे वकिली व्यवसायामुळे सांगोला येथे स्थायिक झाले. त्यावेळी सुरू झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी झोकून दिले. १९६२ साली देशभरात काँग्रेसचे वर्चस्व असतानाही सांगोला विधानसभा निवडणुकीत शेकापकडून देशमुख उभे राहिले आणि वयाच्या ३४ व्या वर्षी ते पहिल्यांदा आमदार झाले.
मुख्यमंत्र्यांकडून शोक
‘‘राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले, ’’ या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. सर्वाधिक काळ आणि सातत्याने त्यांनी राज्य विधिमंडळाचे प्रतिनिधीत्व के ले हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीचे वैशिष्ट होते, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.