- वाकडमधील घटना; तिघांविरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२१) :- मागील काही महिन्यापासून इंटरनेटचे कंत्राट मिळवण्याच्या कारणावरून आरोपी आणि राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी फिर्यादी यांच्यात वाद सुरू होता. दरम्यान, २६ ऑगस्ट २०२१ रोजी आरोपींनी फिर्यादी व त्यांचे भाऊ यांना जातीवाचक शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. १८ ऑक्टोबर रोजी दुपारी आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्यावर हल्ला चढवला.
आरोपीने फिर्यादी यांना चाकुने भोसकले. तसेच, अन्य आरोपींनी त्यांना सिमेंटचा ब्लॉक व हातोड्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना १८ ऑक्टोबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास इको ग्रीन सोसायटी जवळ वाकड येथे घडली.
आरोपी देखील राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाचे समर्थक असल्याची माहिती मिळतेय. ३४ वर्षीय इसमाने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुमित मधुकर भूमकर (रा, भूमकरवस्ती, वाकड), प्रतिक लोखंडे (रा. नवी सांगवी) यांच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वाकड पोलिस करीत आहेत.