न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूरोड (दि. १९ जाने.) :- निसर्गराजा मित्र जीवांचे संस्थेच्या वतीने आणि कॅपजेमीनीच्या मनुष्यबळ विभागाच्या पुढाकाराने आयप्पा टेकडी, देहूरोड येथे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पक्षांसाठी पाणी आणि कृत्रिम घरट्याची व्यवस्था करण्यात आली. कॅपजेमिनिकचे पुनीत कुर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त ही झाडे लावण्यात आली.
आयप्पा टेकडीवर विविध पक्षी आणि प्राण्यांचा वावर असतो. त्यांच्यासाठी पाण्याची कोणतीही सोय नाही. म्हणूनच कॅपजेमिनीच्या टीमकडून टेकडीवर ५ कृत्रिम घरटी, ८-१० ठिकाणी कृत्रिम पाणपोई तसेच २० देशी झाडे लावण्यात आली. यात जांभूळ, आवळा, बोर, पळस, रान पांगारा, अशा झाडांचा समावेश आहे.
यावेळी पूनम पाटील, विकी देशमुख, राकेश पद्मा, विनोद रोडे, मनोज कोरे आदी उपस्थित होते. तसेच निसर्गराजा मित्र जीवांचे या संस्थेचे तेजस लिमये, अपूर्वा कुम्रा, मदन बोकारे हेही उपस्थित होते. निसर्गराजा मित्र जीवांचे ही संस्था या झाडांची काळजी घेणार आहे. तसेच भविष्यात टेकडीवर ५० घरटी बसविण्यात येणार आहे.