- अवघ्या चोवीस तासांच्या आत पोलिसांनी आरोपींना केले गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२१) :- पिंपळे गुरव येथील पेट्रोलपंपाजवळ माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या ‘चंद्ररंग’ डेव्हलपर्सच्या कार्यालयावर मंगळवारी (दि. २३) रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी दोघांनी कार्यालयाच्या दिशेने कार्यालय नष्ट करण्याच्या उद्देशाने ज्वलनशील पदार्थ भरलेल्या दोन बाटल्या फेकून मारल्या होत्या. त्यातील एक कार्यालयाच्या समोर असलेल्या इलेक्ट्रिक डीपीवर तर दुसरी बाटली रस्त्यावर पडला. त्यानंतर ते अज्ञात तिघेजण घटनास्थळावरून पळून गेले होते.
सांगवी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु केला. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पाच पथके तैनात केली होती. अवघ्या चोवीस तासांच्या आता आरोपींचा माग काढून पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यापैकी दोघांना शहरातून तर एकाला हद्दीबाहेरून अटक करण्यात आली आहे. हे तिघेही कासारवाडीतील रहिवासी असल्याचे समजते. तिघांनी गुन्ह्यासाठी वापर केलेल्या दुचाकीच्या रंगावरून तपास करत पोलिसांनी पहाटे दोन वाजता त्यांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत आरोपींनी हे कृत्य केवळ नाव कमावण्याच्या उद्देशाने केले असल्याचे निष्पन्न झाले आहे. अटकेची आणि पुढील प्रक्रिया करून आरोपींना न्यायालयात हजर करायचे आहे. त्यानंतर सर्व बाबी समोर येतील, असे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी सांगितले.
राहुल राम साळुंके (वय ३९, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तिघांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ३०८, ४३६, ५११, ३३६, ३४, ज्वालाग्राही पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ३, ४, ५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.