- पिंपरी चिंचवड पोलिसांकडून चौघांना बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२१) :- पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत सुरू असलेल्या पोलीस भरतीसाठी ‘ डमी ‘ उमेदवार उभे केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना नुकतीच अटक केली. पिंपरी – चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने ही कारवाई केली.
गणेश मारुती रोमन (वय ३०, रा. नारायणगाव, पाटेखैरमळा, ता. जुन्नर जि. पुणे) याला अटक केली आहे. त्याच्यासह ज्ञानेश्वर गोडगोंडा (रा. येडगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत शिपाई पदाच्या ७२० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यात लेखी परीक्षा ९ नोव्हेंबर २०२१ रोजी झाली. त्यातील पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी डिसेंबरमध्ये झाली. त्यानंतर कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवारांना बोलाविण्यात आले. त्यात ३ जानेवारी रोजी पडताळणी दरम्यान आरोपी गणेश रोमन याच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यात लेखी परीक्षेच्या अॅडमिट कार्डवरील त्याचा मूळ फोटो आणि त्याची सही तसेच लेखी परीक्षेसाठी केंद्रात हजर राहण्यापूर्वी लावलेला उमेदवाराचा फोटो व सही यामध्ये विसंगती दिसून आली. त्यामुळे पोलिसांनी आरोपी गणेश रोमन याला ताब्यात घेतले. लेखी परीक्षेचा अभ्यास चांगला नसल्याने त्याच्यासारखा दिसणारा त्याचा मित्र आरोपी ज्ञानेश्वर गोडगोंडा याचा फोटो लावून आरोपी रोमन याने त्याच्या नावाचे डुप्लीकेट आधारकार्ड तयार केले. त्यानंतर गणेश रोमन याने त्याच्याऐवजी आरोपी गोडगोंडा याला लेखी परीक्षेला बसवले, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
बायोमॅट्रिक डेटा न झुळल्याने दुसरे दुसऱ्या प्रकरणात जीवन त्र्यंबक काकरवाल (वय २३), चरणसिंग महासिंग काकरवाल (वय २४) दोघेही रा. रघुनाथपुरवाडी, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद), रवींद्र लालचंद गुसिंगे (रा. हुसेनपूर, चित्तेपिंपळगाव, औरंगाबाद) यांना पोलिसांनी अटक केली. मैदानी चाचणीतील पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरु असताना मंगळवारी (दि. ४) उमेदवार जीवन काकरवाल मैदानी परीक्षेच्या दरम्यान ओळखपत्रावरील त्याचा मूळ फोटो आणि सही यामध्ये तफावत दिसून आली. उमेदवाराचे मैदानी चाचणी घेण्यात आलेल्या बायोमेट्रिक डेटाशी त्याची अंगुली मुद्रा जुळून आली नाही. पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानुसार आरोपी जीवन काकरवाल याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली. लेखी परीक्षा झाल्यावर शारीरिक परीक्षेची तयारी नसल्यामुळे त्याचा अजय गोमलाडू (रा. औरंगाबाद) याच्या मदतीने बनावट उमेदवारास शारीरिक चाचणीसाठी पाठविले. याप्रकरणात जीवन काकरवाल याचा मोबाईल महत्त्वाचा पुरावा असल्याचे समोर आले. मात्र, आरोपीने जीवन काकरवाल याने त्याचा मोबाईल आरोपी रवींद्र गुसिंगे आणि आरोपी चरणसिंग काकरवाल यांच्याकडे दिला. ते दोघेही तो मोबाईल घेऊन गेले. त्यामुळे त्यांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आरोपी रवींद्र गुसिगे आणि चरणसिंग काकरवाल हे दोघेही पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत पात्र झाले होते. ते दोघेही मंगळवारी (दि. ४) कागदपत्र पडताळणीसाठी आले होते. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही प्रकरणांचा तपास गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे करीत आहेत.