- ऑफलाईन सभांना बंदी; व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार पुढील सभा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२१) :- कोरोनाचे संक्रमण वाढून रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने राज्य शासनाने पुन्हा निर्बंध वाढविले आहेत. त्यामुळे पिंपरी – चिंचवड महापालिकेसह सर्व सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे या महिन्याची सर्वसाधारण सभा व इतर सभा ऑनलाइन माध्यमातून आयोजित केल्या जाणार आहेत.
राज्यासह शहरात कोरोनाची रुग्ण झपाटयाने संख्या वाढली आहे. तसेच, ओमायक्रॉनबाधित रुग्णही आढळून येत आहेत. त्यामुळे महापालिका सभांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. सर्वसाधारण सभा, विविध विषय समिती तसेच, इतर बैठका ऑनलाइन माध्यमातून घ्याव्यात, असे आदेश राज्याच्या नगरविकास खात्याने महापालिकेस दिले आहेत.
राज्यातील कोरोना संक्रमण परिस्थितीचा आढावा घेऊन या संदर्भातील पुढील निर्णय कळविण्यात येईल, असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्वसाधारण सभेसह इतर माध्यमातून सभा पूर्वीप्रमाणे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या ऑनलाइन पद्धतीद्वारे घेतल्या जाणार आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे राज्य शासनाने सर्व सभा ऑनलाइन माध्यमातून घ्याव्यात, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासन सर्व सभा ऑनलाइन आयोजित करणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव उल्हास जगताप यांनी सांगितले.