न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२५) :- २०१९ पूर्वीच्या वाहनांना उच्च सुरक्षा पाटी लावण्यासाठी काही ठिकाणी अव्वाच्या सवा दर आकारले जात आहेत. त्यामुळे वाहनधारकांची लूट होत असून, पैसे भरूनही दिलेल्या तारखेनुसार उच्च सुरक्षा पाटी मिळत नसल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दरम्यान चिंचवडगावील तानाजीनगर येथील फिटमेंट सेंटरकडून नवीन नंबर प्लेटसाठी अडीचशे रूपये आणि बसवून देण्यासाठी पन्नास रूपये जादाचे घेतले जात आहेत. त्यामुळे वाहनधारकांना दुहेरी फटका बसत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील २०१९ पूर्वीच्या वाहनांना उच्च सुरक्षा पाटी लावण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नंबर प्लेट लावण्याचे काम करणाऱ्या कंपनीच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
उच्च सुरक्षा पाटी लावण्याचे काम मिळालेल्या कंपन्यांना आरटीओकडून फिटमेंट सेंटर वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही सेंटरची संख्या काही वाढत नाही. त्यामुळे नागरिकांना खूप दूरच्या तारखा मिळत आहेत. त्यात आता काही सेंटरकडून अचानक काम बंद केले जात असल्याचा फटका वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.
नागरिकांना ऑनलाइन अर्ज करण्याची माहिती नाही. त्यामुळे अर्ज करण्यासाठी १०० ते २०० रुपये द्यावे लागत आहेत.













