न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२५) :- न्यायालयात पोटगीचा दावा दाखल केल्याने पतीने विभक्त राहणाऱ्या पत्नीच्या गळ्याला कोयता लावत लिंबू पिळून जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. याप्रकरणी पीडित ३६ वर्षीय महिलेने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिच्या पतीवर गुन्हा दाखल झाला आहे.
पीडितेचे २००४ मध्ये लग्न झाले होते. पती चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर दोघे विभक्त झाले. पोटगीसाठी पीडितेने न्यायालयात दावा दाखल केला. दरम्यान, पीडितेचा पती एक जून २०२४ ला सदनिकेमधून साहित्य शिफ्टिंग करीत होता. त्यावेळी पीडित तेथे गेली. तेव्हा सदनिकेमधील साहित्य पार्किंगमध्ये आणले होते.
तुला काही साहित्य मिळणार नाही, असे बोलून पती सदनिकेमध्ये गेला. मुलांचे साहित्य आणण्यासाठी पीडिता सदनिकेमध्ये गेली. दरम्यान, पीडित महिलेच्या पतीने दारूच्या नशेत पत्नीला शिवीगाळ केली. पीडित महिलेच्या गळ्याला कोयता लावून लिंबू पिळून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. तसेच ‘हे कोणाला सांगितल्यास खून करेन,’ अशी धमकी दिली.