- प्रशासकीय राजवटीत दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक बेहाल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२५) :- शहराच्या सर्वच भागात मोठ्या प्रमाणावर दूषित पाणीपुरवठा होत आहे. तसेच पाणीपुरवठा देखील कमी दाबाने होत असून नागरिकांना पाणी पुरत नाही. या पाण्याला उग्र स्वरूपाचा वास येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी चिखली मोशी हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी केली आहे.
याबाबत सांगळे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यानुसार, शहरातील नागरिकांना येत असलेले पाणी पिण्यासाठी आम्हाला तरी योग्य वाटत नाही. या अशुद्ध पाण्यामुळे पिंपरी चिंचवड शहरांमध्ये रोगराई पसरण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात जलजन्य आजार पसरण्याची शक्यता आहे. येत्या चार दिवसांमध्ये या दूषित पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा झाली नाहीतर फेडरेशन मार्फत लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संजीवन सांगळे यांनी दिला आहे.
मागील पंधरा दिवसांमध्ये पिंपरी चिंचवड शहरात अतिशय घाण स्वरूपाचा आणि उग्र असा वास येणारा पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा महापालिकेकडून केला जात आहे. आयुक्तांचे पाणीपुरवठा विभागावर कसलेही नियंत्रण दिसत नाही. अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे लहान मुले, वयोवृद्ध नागरिक यांना त्रास होत आहे. शुद्ध पाणीपुरवठा झाला नाही तर फेडरेशन मार्फत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात केले जाईल. तसेच अशुद्ध पाणी आयुक्तांना पिण्यासाठी दिले जाईल, असे चिखली मोशी पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी सांगितले आहे.











