न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०१९) :- जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेचे भाजपचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले होते. त्यामुळे ते सहा महिने पालिकेत आले नव्हते.
फेरपडताळणीत त्यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरल्याने पालिकेला त्या कालावधीचे मासिक १५ हजारांप्रमाणे एकूण ९० हजार रुपये मानधन द्यावे लागणार आहे. गायकवाड हे फेब्रुवारी २०१७ महापालिका निवडणुकीत भाजपकडून प्रभाग क्रमांक एक ‘अ’ मधील राखीव जागेतून निवडून आले आहेत. त्यांचे जात प्रमाणपत्र प्रतिस्पर्धी उमेदवाराने आक्षेप घेत बुलडाणा जात पडताळणी समितीकडे तक्रार केली होती. समितीने गायकवाड यांचे जातप्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय २९ सप्टेंबर २०१८ ला दिला होता.











