न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ एप्रिल २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी होणाऱ्या २५ चौकांतील कोंडी सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पहिल्या टप्प्यात दहा चौकांमध्ये वाय जंक्शन संकल्पना, वाहनांसाठी मार्गिका, बोलार्ड बसविणे, संकेतचिन्हे, रस्त्यावर पांढरे पट्टे मारणे, दुभाजक, एकेरी वाहतूक, रस्ता रुंदीकरण करण्यात आले. त्यामुळे या चौकांतील वाहतूक शिस्तबद्ध झाली असून, चौक कोडीमुक्त झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाने ८० चौकांची पाहणी केली. त्यात २५ चौक कोंडीचे आढळल्याने राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमात वाहतूक कोंडीच्या २५ चौकांपैकी पहिल्या टप्प्यात पुनावळे जंक्शन, ताथवडे चौक, भोसरी येथील वखार महामंडळ चौक, शिवार चौक, स्वराज्य, घरकुल, त्रिवेणीनगर आणि आकुर्डीतील खंडोबा माळ परिसरातील वाय जंक्शन या दहा चौकांतील कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. त्यामध्ये चौकांची नव्याने रचना करण्यात आली. अतिक्रमण हटविले. वाय जंक्शनद्वारे सुस्पष्ट रस्ता विभाजन, रस्ते दुरुस्ती, दुभाजक, पांढऱ्या रंगाचे पट्टे मारून वाहनासांठी मार्गिका, काही चौकांमध्ये वाहतूक नियंत्रण सिग्नल, एकेरी मार्ग, चौकांमधील सर्कल हटविणे, रस्ते रुंद करणे, पादचारी, सायकलस्वारांसाठी स्वतंत्र मार्गिका बनविणे आदी कामे करण्यात आली.
दहा चौक कोंडीमुक्त करण्यासाठी सुरुवावीला तात्पुरत्या उपाययोजना केल्या. त्यानुसार वाहतूक कोंडी सुटते का, याचा अभ्यास केला. त्यानुसार डिझाईन करून कायमस्वरूपी उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे चौकातील वाहतूक सुरळीत झाली. वाहन चालकांना वाहतुकीत सुसूत्रता, सुरक्षिततेचा अनुभव मिळत आहे. प्रवासाचा वेळ व इंधनाची बचत होत आहे. अपघातांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे. उर्वरित १५ चौक लवकरच कोंडीमुक्त करण्यात येणार आहेत, असे महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाचे सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.











