- आता अनधिकृत प्रार्थनास्थळांना बांधकाम विभागाकडून नोटीसा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ एप्रिल २०२५) :- महापालिकेकडून चिखली, कुदळवाडीत मोठी कारवाई करत अनधिकृत भंगार गोदामे, लघुउद्योग भुईसपाट करण्यात आले. त्यावेळी प्रार्थनास्थळांना कारवाईतून वगळण्यात आले होते. मात्र, आता महापालिकेकडून अनधिकृत प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. त्यानुसार २५ जणांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. तसेच, प्रार्थनास्थळांचे बांधकाम काढून घेण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे.
चिखली, कुदळवाडीतील एकूण २५ प्रार्थनास्थळांना बांधकाम परवानगी विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या सहीने नोटिसा बजावल्या आहेत. त्यांना १५ दिवसांची मुदत देत प्रार्थनास्थळाचे बांधकाम काढून घेण्याचा इशारा दिला आहे. यांतील काही प्राचीन प्रार्थनास्थळे वगळली जाण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, नदीपात्रातील बांधकामांवर नोटिसा देऊनही पालिका प्रशासन कारवाई करू शकले नाही. त्यात अचानकपणे प्रार्थनास्थळांना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, कारवाईबाबत अधिकारी अधिकृतपणे बोलण्यास टाळाटाळ करीत आहेत. महापालिकेने या भागात कारवाई करून सुमारे सात हजार व्यावसायिक आस्थापनांवर हातोडा टाकाला. या कारवाईनंतर लघुउद्योजकांना आर्थिक संकटात आणल्याचा आरोप महापालिका प्रशासनावर झाला होता.
अनधिकृत प्रार्थनास्थळांना पालिकेने गुरुवारी (दि. २४) नोटिसा बजावल्या. त्याविरोधात महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर शुक्रवारी (दि. २५) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वाहतूक आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.











