न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०१९) :- पुण्यातील डेक्कन परिसरातील फर्ग्युसन रोडवरील बर्गर किंग येथे काही दिवसांपूर्वी एका बर्गरमध्ये काचेचे तुकडे आढळले होते. ते काचेचे तुकडे ज्या बर्गरमध्ये होते ते बर्गर खाण्यात आल्यामुळे एका तरुणाला अत्यवस्थ वाटून रक्ताच्या उलट्या झाल्या.
त्यामुळे त्याला रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घ्यावे लागले. एवढं होऊनही बर्गर किंगच्या व्यवस्थापकाने त्या मुलाला नुकसान भरपाई दिली नाही. उलट त्याला तुम्हाला काय करायच ते करा? ही भाषा वापरली.
त्या तरुणाच्या वतीने शिवाजीनगर मनसेने बर्गर किंगच्या व्यवस्थापकाला निवेदन दिले आहे. येत्या तीन दिवसात त्या तरुणाला नुकसान भरपाई द्या. नाहीतर आउटलेट बंद करा. अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे मनसेने दिला आहे.
यावेळी शिवाजीनगर विधानसभा अध्यक्षा लावण्या शिंदे, बोपोडी मनसे अध्यक्ष अंकित नाईक व पदाधिकारी उपस्थित होते.


















