न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २२ मे २०१९) :- पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर व मावळ या चारही लोकसभा मतदार संघाची मतमोजणी येत्या २३ मे रोजी होणार आहे. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणी कक्षाच्या बाहेरील परिसरात व आतील बाजूस कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे. त्यातही प्रशासनाकडून पास देण्यात आलेल्या व्यक्तींनाच मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार आहे.
परिणामी कोणत्या उमेदवाराला कोणत्या फेरीत किती मते मिळाली याबाबतची माहिती मतदान कक्षातील व्यक्तींना तात्काळ समजणार असली तरी त्याचवेळी निवडणूक आयोगाला सहायक निवडणूक अधिका-यांकडून मतमोजणीची आकडेवारी ऑनलाईन पध्दतीने कळविली जाणार आहे. त्यामुळे निवडणूक अधिका-याने ऑनलाईन भरलेली माहिती ‘वोटर हेल्पलाईन’ या मोबाईल अॅपवरही दिसणार आहे.
‘वोटर हेल्पलाईन’ हे निवडणूक आयोगाचे अधिकृत मोबाईल अॅप आहे. त्यामुळे निकालाची अधिकृत आकडेवारी प्रत्येकाला आपल्या मोबाईलवर पहाता येणार आहे. सर्व सामान्य नागरिकांना सुध्दा आपल्या मोबाईलवर मतमोजणीची आकडेवारी समजू शकेल, असे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले.











