- राष्ट्रवादी आणि शिवसेनेबाबत वरिष्ठ निर्णय घेणार..
- नवनिर्वाचित भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२५) :- पिंपरी चिंचवड शहर भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांना शुक्रवारी नियुक्ती पत्र देण्यात आले. औपचारिकपणे आज कार्यालयाचा कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला. पुढील काही दिवसांत नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात येणार आहे.
यावेळी प्रभारी तथा आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, माजी नगरसेवक, पदाधिकारी तथा कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत नवनिर्वाचित शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, भाजपच्या पिंपरी चिंचवड शहरातील चारही आमदारांच्या पाठींब्यामुळे मला शहराध्यक्ष होता आले. हे सर्व आमदार सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास सदैव सक्षम आहेत. शहराध्यक्ष पदावरून आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आमदार शंकर जगताप यांनी मला दिलेला शब्द पाळला आहे. चारही आमदारांची मते जाणूनच पक्षाची पुढची दिशा ठरविणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचाच महापौर होईल. शहर राष्ट्रवादी आणि शिवसेना या मित्र पक्षांशी पक्षश्रेष्ठी बोलणी करतील. त्यानुसार महायुती की स्वबळ याचा निर्णय घेतला जाईल.
दरम्यान शूर शहीदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि सीमेवरील सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी चिंचवड येथील क्रांतीगुरु वासुदेव बळवंत फडके स्मारकापासून ते पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत ‘तिरंगा पदयात्रे’चे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.


















