न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. १७ मे २०२५) :- देहूगावजवळ इंद्रायणी नदीत पोहण्याचा आनंद घेत असताना तेरा वर्षीय मुलगा बुडाला. ही घटना शुक्रवारी (दि. १६) दुपारी बोडकेवाडी येथे घडली. तरुण विष्णू गुप्ता (१३, रा. देहूरोड) असे मुलाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, तरुण गुप्ता त्याच्या मित्रांसोबत देहूगावजवळ बोडकेवाडी येथे इंद्रायणी नदीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. तो त्याच्या सहा मित्रांसोबत नदीत पोहण्यासाठी उतरला. पोहण्याचा आनंद घेत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.
मुलगा पाण्यात बुडतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर पोलिस आणि वन्यजीवरक्षक मावळ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली. अनिल आंद्रे, गणेश गायकवाड, भास्कर माळी, अनिश गराडे, कुंदन भोसले, गणेश सोंडेकर, नीलेश गराडे यांनी तरुण गुप्ता याचा मृतदेह बाहेर काढला.










