- नगरसेविका योगिता महेश बारणे यांच्या पुढाकारातून थेरगावात शून्य कचरा शाळा प्रकल्प..
- विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची संस्कृती रुजविण्याचा उपक्रम..
- आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ४ नोव्हेंबर २०२६) : थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळेत नगरसेविका योगिता महेश बारणे यांच्या पुढाकारातून ‘स्वच्छ, सुंदर, शून्य कचरा शाळा’ हा अभिनव प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. शाळेत निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन शाळेतच करून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

नगरसेविका योगिता महेश बारणे यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेत शाळेत शून्य कचरा संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शून्य कचरा रिसायकल बॅग आणि शून्य कचरा किटचे वाटप करण्यात आले. शाळेच्या परिसरात कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, संकलन आणि व्यवस्थापन करण्यावर भर दिला जाणार आहे.
यावेळी आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, शाळेत निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन शाळेतच झाले पाहिजे. यासाठी ‘शून्य कचरा मॉनिटर’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी केवळ शाळाच नव्हे, तर आपल्या घरातील स्वच्छता आणि कचरा वर्गीकरणाबाबतही पालकांना जागरूक करावे. थेरगाव शाळेत हा पायलट प्रकल्प राबवून त्याचे परिणाम तपासल्यानंतर शहरातील अन्य शाळांमध्येही त्याची अंमलबजावणी करण्याचे नियोजन आहे. हा उपक्रम शहराला शून्य कचऱ्याच्या दिशेने नेणारे महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आयुक्तांनी विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता के सुपरहीरोज’ या पुस्तकाचे वाटप केले. विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचून स्वच्छतेचा संदेश घराघरांत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले. मोबाईलपेक्षा पुस्तक वाचन, खेळ आणि चांगल्या सवयींना प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाला स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, शिक्षण समिती सभापती रवीना आंगोळकर, नगरसेविका रिटा सानप, योगिता बारणे, नगरसेवक तानाजी बारणे, क्षेत्रीय अधिकारी मुकेश कोळप, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, आरोग्य अधिकारी अतुल सोनवणे, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
दरम्यान, आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी थेरगाव येथील पीएम श्री माध्यमिक शाळेलाही भेट दिली. तेथील अॅस्ट्रोनॉमी लॅब, टिंकरिंग लॅब, रायफल शूटिंग प्रशिक्षण केंद्र आणि सीसीटीव्ही यंत्रणेची पाहणी केली. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वारली चित्रांचेही त्यांनी कौतुक केले.

















