३३ वर्षांचा विधी क्षेत्रातील अनुभव..
पिंपरी-चिंचवडच्या वकील वर्गात आनंदाचे वातावरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०४ नोव्हेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. संजय भाऊसाहेब दातीर पाटील यांची महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या शिस्तपालन समितीच्या (डिसिप्लिनरी कमिटी) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या प्रदीर्घ विधी सेवेची, संघटनात्मक कार्याची आणि सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या निवडीमुळे पिंपरी-चिंचवडच्या वकील वर्गात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अॅड. संजय दातीर पाटील यांना विधी क्षेत्रात ३३ वर्षांचा अनुभव आहे. सन १९९४ मध्ये महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलकडून वकिलीची सनद प्राप्त झाल्यानंतर त्यांनी वकिली व्यवसायाला सुरुवात केली. सन १९९६-९७ मध्ये त्यांनी पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे उपाध्यक्षपद, तर २००६-०७ मध्ये अध्यक्षपद भूषविले. या कार्यकाळात वकिलांच्या हितासाठी तसेच संघटनेच्या बळकटीकरणासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. बार कौन्सिलच्या निवडणूक समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
सन २००५ पासून ते नोटरी व्यवसायात कार्यरत असून, विविध बँका आणि पतसंस्थांना कायदेशीर सल्लागार म्हणूनही त्यांनी सेवा दिली आहे. पिंपरी न्यायालयात त्यांनी यशस्वीपणे न्यायालयीन कामकाज केले आहे. तसेच पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट सोसायटीचे सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. पुणे लॉयर्स कन्झ्युमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे तज्ज्ञ संचालक सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
विधी क्षेत्राबरोबरच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. कोविड महामारीच्या कठीण काळात वकील वर्गासह गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. पिंपरी-चिंचवड न्यायालयीन इमारतीच्या बांधकाम समितीचे सदस्य म्हणून न्यायालयीन पायाभूत सुविधांच्या विकासासाठीही त्यांनी योगदान दिले आहे.
त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाची आणि कार्याची दखल घेत महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने त्यांची शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. या नियुक्तीबद्दल पिंपरी-चिंचवडमधील वकील, विधी क्षेत्रातील मान्यवर आणि विविध सामाजिक स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.


















