न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १८ मे २०२५) :- महिला आरक्षणाचे विधेयक मान्य होणार नाही, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज थांबणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री असताना पवार साहेबांनी घेतली आणि महिलांना ३३ टक्के आरक्षणाचे विधेयक मान्य झाले. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात महिला आरक्षणाची सुरुवात झाली, असे मत उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
जागतिक मातृदिनानिमित्त बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित केलेल्या ‘मातृनाम प्रथम’ या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी आमदार भीमराव तापकीर, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी नगरसेवक प्रकाश कदम, युवराज बेलदरे, वर्षा तापकीर, राणी भोसले, अश्विनी भागवत, हर्षवर्धन पाटील, अभिनेता संकर्षण कऱ्हाडे उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचे विधेयक आणले. महिला जर चूल आणि मूल आणि घर सांभाळू शकते, तर ती गाव, नगर परिषद, महापालिका देखील सांभाळू शकते, असा विश्वास त्यांना होता. महिला आरक्षणाचे विधेयक मान्य झाल्याशिवाय सभागृहाचे कामकाज थांबणार नाही, अशी भूमिका पवार साहेबांनी घेतली होती. पहाटे ४ वाजेपर्यंत सभागृह चालवून महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर करून घेतले. महाराष्ट्र हा खऱ्या अर्थाने मातृ प्रथम राष्ट्र आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण महत्त्वाचे आहे, त्यांना माँसाहेब जिजाऊंनी घडवले, असेही ते म्हणाले.