न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०२५) :- श्री संत तुकाराम महाराज आषाढी पायी वारी पालखी प्रस्थान सोहळा महिन्यावर आला आहे. या वर्षी श्री संत तुकाराम महाराज पालखी रथासाठी तीन बैलजोड्या संस्थानतर्फे विकत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.पायी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री संत तुकाराम महाराज संस्थानची बैठक देहूगावात शुक्रवारी (दि. १६) आयोजित करण्यात आली होती. यामध्ये संस्थानच्या निकषात बसतील अशा दोन बैलजोड्या श्री संत तुकाराम महाराज पालखी रथासाठी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, एक सर्वसाधारण बैलजोडी चौघडा गाडीसाठी विकत घेण्यात येणार आहेत.
श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख वैभव महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, दिलीप महाराज मोरे विश्वस्त उमेश महाराज मोरे, विक्रमसिंह महाराज मोरे, लक्ष्मण मोरे आदींच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.
दरवर्षी श्री संत तुकाराम महाराज पालखी रथाच्या बैलजोड्यांसाठी अर्ज करण्याचे आवाहन देहू देवस्थान संस्थानच्या वतीने करण्यात येते. त्यानुसार, इच्छुक बैलगाडा मालक, शेतकरी आपल्या बैलजोड्या जुंपण्यासाठी अर्ज करतात. त्यातून देवस्थानच्या निकषात आणि नियमांत बसणाऱ्या बैलजोड्यांची निवड करण्यात येत होती. अशा वेळी काहीजण नाराज होत होते. त्यामुळे यावर्षी देहू देवस्थान संस्थान स्वतःच विकत बैलजोड्या घेणार असल्यामुळे कुणीही अर्ज करू नये, असे आवाहन पालखी सोहळाप्रमुख हभप दिलीप महाराज गोसावी यांनी केले आहे.
श्री संत तुकाराम महाराज पालखी रथास जोडण्यासाठी कोल्हापूर, सातारा आणि कर्नाटकच्या बाजारपेठेत जाऊन बैलांची पाहणी करून तीन जोड्या विकत घेण्यात येणार आहेत. त्याचे नियोजन येत्या दोन-तीन दिवसांत करण्यात येणार असल्याचे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे.
















