- लोकप्रतिनिधींनी प्रशासनास जाब विचारावा; गुरुद्वारा परिसर समन्वयक (घर बचाव संघर्ष समिती)…
पिंपरी (दि. ०३ जून २०२५) :- सध्या घर बचाव संघर्ष समितीच्या विभागीय परिसर समन्वयकांच्या बैठकीचे सत्र सुरू असून नुकतीच वाल्हेकरवाडी चिंचवड परिसरातील गुरुद्वारा परिसरात घर बचाव संघर्ष समितीची महत्वपूर्ण बैठक पार पडली. तत्पूर्वी कासारवाडी परिसर, रहाटणी परिसर, बिजलीनगर परिसरात समन्वयकांच्या महत्वपूर्ण बैठका पूर्ण झाल्या असून बैठकीत एचसीएमटीआर रिंग रेल्वे प्रकल्पाविरोधात कायदेशीर लढाई तीव्रतेने सुरू करण्याचे ठरविण्यात आले.
या प्रसंगी घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक डॉ.विजयकुमार पाटील यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस घर बचाव संघर्ष समितीचे समन्वयक माउली जगताप, नारायण चिघळीकर, प्रितम पवार उपस्थित होते. त्याचप्रमाणे समितीचे सदस्य विशाल बाविस्कर,अन्वर मुल्ला, माणिक सुरसे, पांडुरंग काळे, बाळुमामा चौधरी, विपुल जगताप उपस्थित होते.
या प्रसंगी घर बचाव संघर्ष समितीचे समन्वयक नारायण चिघळीकर म्हणाले,” गुरुद्वारा परिसरात येथील रहिवासी गेल्या ३० वर्षांपासून रहात असून.येथील भुमीपुत्रांनी अगोदरच २४ मीटर रस्त्यासाठी त्यांची जमीन दिलेली आहे.आमचा विरोध विकासाला नाही परंतु विकासाच्या नावाखाली कालबाह्य रिंग रेल्वे प्रकल्पाला आहे.”
घर बचाव संघर्ष समितीचे समन्वयक माऊली जगताप म्हणाले,” रिंग रेल्वे प्रकल्प हा सध्याच्या काळात वाढलेल्या शहरासाठी निरुपयोगो ठरू शकतो.या संदर्भात मावळचे खासदार संसदरत्न श्रीरंग बारणे प्रयत्नशील असून अलायमेंट करून बाधित घरांना कसे वाचवता येईल याबाबत उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहेत.”
घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक डॉ विजयकुमार पाटील म्हणाले,” २०१९ मध्ये नगररचना विभागाने इरादा जाहीर केल्यानंतर तत्कालीन विशेष घटक समिती कडे चिंचवड विभागाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी सूचना व आक्षेप नोंदविला होता त्याचप्रमाणे नगररचना अधिकारी यांनी सुद्धा एचसीएमटीआर संदर्भात चेंज अलायमेंट साठी जनतेच्या सूचना विशेष घटक समितीकडे पाठविल्या जातील असे स्पष्ट केले होते. परंतु त्याबाबत प्रत्यक्षात कोणतेच अलायमेंट सुचवलेले दिसून आले नाही. त्यामुळे सादर केलेला प्रारूप विकास आराखडा हा नियमाकुल नाही.”
बैठकीचे आयोजन समन्वयक प्रितम पवार, अन्वर मुल्ला यांनी केले.