न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बंगळुरु (दि. ०४ जून २०२५) :- तब्बल १८ वर्षांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं आयपीएलचं जेतेपद पटकावलं. यानंतर देशभरातील आरसीबीच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. आरसीबीचं होमग्राऊंड असलेल्या बंगळुरुतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर चाहते जमले. चाहत्यांची एकच गर्दी उसळल्यानं चेंगराचेंगरी झाली. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेनं आरसीबीच्या आयपीएल विजेतेपदाच्या सेलिब्रेशनला गालबोट लागलं आहे. आरसीबीचा विजय साजरा करण्यासाठी हजारो चाहते चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर जमले होते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानं एकच गोंधळ झाला. त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरी सात जणांना जीव गमवावा लागला.
गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये काल आयपीएलचा अंतिम सामना झाला. त्यात रजत पाटीदाराच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या पंजाब किंग्सचा ६ धावांनी पराभव केला. आरसीबीनं तब्बल १८ वर्षांनी आयपीएलचं जेतेपद पटकावलं. आरसीबीनं पहिल्यांदाच आयपीएलचं जेतेपद पटकावल्यानं संघाचे चाहते बेभान झाले. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये जाण्यासाठी आरसीबीच्या चाहत्यांची मोठी गर्दी उसळली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सेलीब्रेशन करणारी गर्दी एकाएकी नियंत्रणाबाहेर गेली आणि गोंधळ उडाला. चेंगराचेंगरी झाल्यानं काही जण चिरडले गेले. त्यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
सध्याच्या घडीला आपत्कालीन सेवा देणारे विभाग घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आयोजकांच्या बेजबाबदारपणापणे गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस प्रशासनानं सुरु केला आहे. चेंगराचेंगरीत मृत पावलेल्यांची ओळख अद्याप पोलिसांनी जाहीर केलेली नाही. मृतांची आणि जखमींची आकडेवारी अद्याप समजलेली नसल्याचं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितलं. शिवकुमार घटनास्थळाकडे निघालेले आहेत. आरसीबीचे समर्थक, चाहते मोठ्या संख्येनं स्टेडियमबाहेर उपस्थित होते. आम्ही सुरक्षेसाठी ५ हजाराहून अधिक कर्मचारी तैनात केले होते. आम्ही स्थितीवर लक्ष ठेवून आहोत. या प्रकरणी लवकरच सविस्तर माहिती देऊ, असं शिवकुमार म्हणाले. या दुर्घटनेमुळे आरसीबीच्या जेतेपदाला गालबोट लागलं आहे.