- अकरा महिन्यांत केवळ दोन भिंती उभारल्या..
- देहू-देहूरोड पालखी मार्गावरील नागरिक त्रस्त…
देहूगाव प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ जानेवारी २०२६) :- देहू नगरपंचायत हद्दीतील देहू ते देहूरोड या पालखी मार्गावरील परंडवाल चौक येथील पुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या चौकातील पुलाच्या कामाला अकरा महिने उलटूनही ठोस प्रगती मिळालेली नाही.
मार्च महिन्यात देहू नगरपंचायतीकडून पुलासाठी मार्किंग करण्यात आले होते. त्यानंतर काम सुरू झाले असले तरी आजपर्यंत केवळ दोन भिंती उभारण्यात आल्या आहेत. एवढ्या कालावधीत इतकीच कामगिरी झाल्याने कामाच्या नियोजनावर आणि अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, मुख्याधिकारी चेतन कोंडे यांनी या ठिकाणी ४५ मीटर रुंदीच्या पुलाचे काम सुरू असल्याचे सांगितले आहे. पाच कोटी ४८ लाख रुपयांच्या निधीतून हा पूल उभारला जाणार असून एका पिलरचे काम पूर्ण झाले आहे, तर दुसऱ्या पिलरचे काम सुरू आहे. मात्र, प्रत्यक्षात कामाचा वेग अत्यंत मंद असल्याचे चित्र आहे.
या संथगतीमुळे परंडवाल चौकात वारंवार वाहतूक कोंडी होत असून वाहनचालक आणि भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पालखी मार्गावरील हा पूल कधी पूर्ण होणार, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.











