न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. ०४ जून २०२५) :- किराणा दुकानातील महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या कंपाउडरला पोलिसांनी अटक केली, २० किलोमीटर अंतरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून सहा तासात त्याला शिताफिने पकडले, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी ही कारवाई केली.
यशवंत दिगंबर सूर्यवंशी (३२, रा. बालाजीनगर, मेदनकरवाडी, चाकण) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी ६५ वर्षीय महिलेने चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे चाकण येथे किराणा दुकान आहे. फिर्यादी महिला ३ जून रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास दुकानात एकटी असताना संशयित दुकानामध्ये आला, चॉकलेट आणि बडीशेप खरेदी करण्याचा त्याने बहाणा केला. महिलेच्या बेसावधपणाचा फायदा घेऊन त्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावले. त्यानंतर दुचाकीवरून तो चाकणच्या दिशेने पसार झाला. याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीकडून दुचाकी व २२ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने असे एक लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सहा तासात गुन्ह्याची उकल केल्याने युनिट तीनच्या पोलिसांचे कौतुक होत आहे.