न्यूज पीसीएमसी नेटवर्क
इंदोरी (दि. १६ जून २०२५) :- कुंडमळा येथील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे शेलारवाडी आणि कुंडमळा या गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. या ग्रामस्थांना शेतीचे साहित्य आणण्यासाठी किंवा लोकलने प्रवास करण्याकरिता देहूगाव किंवा तळेगाव येथून तब्बल आठ ते दहा किलोमीटरचा वळसा घालून ये-जा करण्याची वेळ आली आहे.
रांजणखळग्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर सुमारे ३५ वर्षापूर्वी लोखंडी पूल उभारण्यात आला होता. पूल कमकुवत झाल्यामुळे काही वर्षापूर्वी त्याला सिमेंट काँक्रीटचा मुलामा देण्यात आला होता. त्यानंतरही पुलाची दयनीय अवस्था झाली होती.
पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक येतात. त्यावेळी या पुलावर मोठी गर्दी होते. पूल कोसळल्यामुळे शेलारवाडी आणि कुंडमळा या दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. केदारवाडी येथील ग्रामस्थांना शेतीची अवजारे व खते खरेदी करण्यासाठी इंदोरी येथे जावे लागते.
कुंडमळा येथील विद्यार्थी, पुण्यात लोकलने ग्रामस्थांना जाण्यासाठी प्रवास करण्याकरिता बेगडेवाडी किंवा तळेगाव रेल्वे स्टेशन येथे जावे लागते. पूल कोसळल्यामुळे येथील नागरिकांना गैरसोय सहन करावी लागणार आहे. आठ ते दहा किलोमीटरचा वळसा घालून देहूगाव किंवा तळेगावमार्गे ये-जा करावी लागणार आहे.











